हॉस्पिटल क्वॉरंटाइन होण्यापेक्षा होम क्वॉरंटाइन व्हा: अजितदादा

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरात थांबा, अशा सूचना देऊनही काही लोक त्या पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे जे आज घरात थांबणार नाहीत, ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशारा देतानाच करोनापासून वाचण्यासाठी ‘होम क्वॉरंटाइन’ किंवा ‘हॉस्पिटल क्वॉरंटाइन’ होणं हे दोनंच पर्याय आहेत. त्यामुळे ‘कोरोना’मुळे ‘हॉस्पिटल क्वॉरंटाइन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वॉरंटाइन’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना घरातच थांबण्याचं कळकळीचं आवाहन केलं. राज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दूध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करू नये, असं अजित पवार म्हणाले. दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करू नये, त्याला परवानगी दिली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.