घराबाहेर गेल्यास दंडुका!

संचारबंदी आणि जमावबंदी लागू असतानाही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी अखेर कायद्याचा 'दंडुका' दाखविण्यास सुरुवात केली आहे. जमावबंदी आदेश धुडकावणाऱ्यांवर गेल्या दोन दिवसांत ११२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासनाने जारी केलेला आदेश धुडकाविल्याप्रकरणी कलम १८८ अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये हॉटेल्स, पान टपऱ्या, इतर दुकाने, फेरीवाले, अवैध वाहतूक करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

करोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभर संचारबंदी लागू केली. असे असतानाही मुंबईच्या अनेक भागांमध्ये लोक घराबाहेर पडत होते. सुरुवातीला पोलिसांनी अशा लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र मुंबईकर ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली. मंगळवारपर्यंत पोलिसांनी मुंबईत ११२ गुन्हे दाखल केले. करोनाचे संशयित असून घराबाहेर पडलेल्यांवर पाच गुन्हे दाखल करण्यात आले. परवानगी नसताना हॉटेल उघडे ठेवून गर्दी जमविणाऱ्या १६ हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सिगारेट, तंबाखू, पान विकणाऱ्या ६, तर १८ फेरीवाल्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी घोळके करून असलेल्या दहा ठिकाणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही बेकायदा वाहतूक करणाऱ्या सहा जणांवर कारवाई करण्यात आली.